रांची, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन विश्वासदर्शक ठराव जिंकले. याआधी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेने राज्याचे मुख्यमंत्री होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अटक करणार याची जाणीव झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला. यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड केली. झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर विश्वासदर्शक ठराव सादर करण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना पाच दिवसांची मुदत दिली होती. चंपी सोरेन यांनी राज्यपालांच्या निर्देशानुसार विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन विश्वासदर्शक ठराव सादर केला. चंपई सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने ४७ तर विरोधात २९ आमदारांनी मतदान केले. विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याआधी चंपई सोरेने यांनी सरकारच्या बाजूने असलेल्या सर्व आमदारांना हैदराबाद येथे सुरक्षित ठेवले होते. थेट विशेष अधिवेशनासाठी आमदारांना हैदराबादमधून झारखंडमध्ये आणण्यात आले.