२९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मालदीवच्या संसदेत रविवारी, (२८ जानेवारी) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. संसदेतील या राड्यामुळे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर होत असलेले मतदान स्थगित झाले.
भारताशी पंगा घेणाऱ्या मालदीव देशाच्या संसदेत ही घटना घडली आहे. मालदीवचे नवे अध्यक्ष मुइज्जू हे गेल्या वर्षी निवडून आले आहेत. अध्यक्ष मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी मालदीवच्या संसदेत मतदान होणार होते. रविवारी दुपारची वेळ यासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या मतदानाला विरोधी पक्षांनी विरोध केला होता. विरोधी पक्षांनी मतदानापूर्वी स्पीकरच्या खोलीत पोहोचून त्यांची भेट घेतली. हे मतदान रोखण्याची विनंती केली. पण, सभागृहात मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामुळे विरोधक संतापले आणि त्यांनी स्पीकरच्या खुर्चीजवळ जात गोंधळ घालण्यास सुरवात केली. विरोधकांनी मतदान पत्रिकाही हिसकावून घेत आपल्या ताब्यात घेतल्या.
दुसरीकडे अध्यक्ष मुइज्जू यांच्या समर्थक सदस्यांनीही घोषणाबाजी करायला सुरवात केली. त्यांनी विरोधी पक्षांचे सदस्य यांची मागणी खोडून काढत मतदानाची मागणी लावून धरली. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली.