Sunday, July 07, 2024 05:51:50 PM

प्रभू रामाचे दर्शन 'या' वेळेत घेता येणार

प्रभू रामाचे दर्शन या वेळेत घेता येणार

अयोध्या, २७ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : अयोध्येतील राम मंदिरामधील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आता दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकही मोठ्या संख्येने रामनगरीत पोहोचत आहेत. आतापर्यंत श्रीरामाच्या दर्शन आणि आरतीची कोणतीही निश्चित वेळ नव्हती. मात्र भाविकांची प्रचंड गर्दी पाहता श्री रामजन्मभूमी ट्रस्टने आरती आणि दर्शनाची वेळ यादी जाहीर केली आहे.

ट्रस्टने जाहीर केली आरती आणि दर्शनाची वेळ :

विश्व हिंदू परिषदेचे मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार वाजता श्रीरामाची आरती होणार आहे. श्रृंगार आरती सकाळी ६:३० वाजता होईल. सकाळी सातपासूनच भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. दुपारी १२ वाजता भोग आरती आणि सायंकाळी ७:३०वाजता संध्या आरती होईल. रात्री ९ वाजता जेवण आणि रात्री १० वाजता शयन आरती होईल.

प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी रामभक्तांचा मार्गही आता सुकर झाला आहे. रामदर्शनासाठी राम मंदिराजवळ वाहतूकही पूर्ववत आली आहेत. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी उदय चौक आणि साकेत पेट्रोल पंपावरून वाहतूक सुरळीत केली आहे. ई-बसशिवाय ई-रिक्षाही सुरू झाल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक एपी सिंह यांचा हवाला देत पीआरओ दिलीप कुमार दुबे यांनी सांगितले की, अयोध्येतील गर्दी नियंत्रणात आहे. जिल्ह्यांच्या सीमेवरील वाहतूक पूर्ववत होईल. अयोध्येच्या एंट्री पॉईंट साकेत पेट्रोल पंपापासून लता चौकापर्यंत आणि उदया चौकाहून तेधी बाजारापर्यंत ई-रिक्षा आणि ई-बसची सेवा सुरु केली आहे.

त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या लोकांना मंदिराजवळ जाण्याची सुविधा दिली जात आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून ते भाविकांना मदत करतील.


सम्बन्धित सामग्री