Wednesday, October 02, 2024 10:59:52 AM

अर्जुन पुरस्कार विजेत्या जिल्हा पोलीस अधिक्षकाची हत्या

अर्जुन पुरस्कार विजेत्या जिल्हा पोलीस अधिक्षकाची हत्या

जालंधर, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंजाबमध्ये जालंधर येथे अर्जुन पुरस्कार विजेत्या जिल्हा पोलीस अधिक्षकाची हत्या करण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक दलबीर सिंह देओल यांचा मृतदेह जालंधरमध्ये बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत पडल्याचे आढळले. दलबीर सिंह देओल यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतदेहाच्या डोक्यावर जखमेची खूण दिसत आहे तसेच मानेत गोळी दिसत आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक दलबीर सिंह देओल मूळचे जालंधरचे आहेत. पण ते संगरूर येथे कार्यरत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा घटनास्थळी तसेच आसपास दलबीर सिंह देओल यांचे अधिकृत शस्त्र (सर्व्हिस रिव्हॉल्व्हर) आढळले नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी एक पोलीस कारवाई सुरू असताना दलबीर सिंह देओल यांचा स्थानिकांशी वाद झाला होता. यानंतर त्यांची हत्या झाली. यामुळे वादाचा हत्येशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार नव्या वर्षाची पार्टी केल्यानंतर दलबीर सिंह देओल वाहनातून घराच्या दिशेने निघाले. देओल यांनी सांगितले म्हणून त्यांना चालकाने एका बस थांब्याजवळ सोडले. एरवी दलबीर सिंह देओल यांच्यासोबत कायम रक्षक असतो. पण देओल गाडीतून उतरले त्यावेळी सोबत रक्षक नव्हता. ते एकटेच तिथे उतरले होते. यानंतर काय घडले हे जाणून घेण्यासाठी तपास पथक परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासत आहे.

दलबीर सिंह देओल यांना भारोत्तालनातील अतुलनीय कामगिरीसाठी काही वर्षांपूर्वी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता त्यांची हत्या झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

              

सम्बन्धित सामग्री