Saturday, July 06, 2024 11:29:53 PM

विश्वचषकात आज कांगारुंशी सलामी

विश्वचषकात आज कांगारुंशी सलामी

विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या मोहिमेला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही लढाई रंगणार आहे. अलिकडेच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवशीय मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. असं असलं तरीही ऑस्ट्रेलिया संघाची लढाऊ वृत्ती त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही, हे निश्चित. भारतीय फलंदाजी आणि कांगारुंची गोलंदाजी यात प्रामुख्यानं द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाने शेवटचा विश्वचषक २०११ मध्ये जिंकला होता. त्यानंतर दोन विश्वचषक होऊन गेले, पण भारतीय संघाचे हात रिकामेच राहिले. मात्र, यावेळी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. अशातच मायभूमीवर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत १२ वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदाकडे लक्ष लागलेलं असून हे लक्ष्य गाठण्यासाठी त्याची मोहीम रविवारपासून (८ ऑक्टोबर) सुरू होत आहे.

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा स्टार ओपनर शुभमन गिल आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिलऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. चेपॉकची खेळपट्टी स्पिनर्ससाठी अनुकूल मानली जाते, त्यामुळे टीम इंडिया आजच्या सामन्यात तीन स्पिनर्ससह मैदानात उतरणार आहे. म्हणजेच, जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासोबत आर अश्विनही प्लेइंग-११ मध्ये असू शकतो.

भारत (संभाव्य प्लेईंग-११)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया (संभाव्य प्लेईंग-११)

डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), जोश हेजलवुड, एडम जम्पा.


सम्बन्धित सामग्री