Friday, September 20, 2024 06:56:59 AM

कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्यावर बंदी, पण…

कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्यावर बंदी पण…

नवी दिल्ली, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. भारत सरकारने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याची तसेच त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. ही प्रक्रिया स्थगित केली असली तरी कॅनडाच्या नागरिकांना अनिवासी भारतीय नागरिकत्वासाठी (Overseas Citizenship of India / OCI) अर्ज करण्याची मुभा आहे. या अर्जांचा नियमांच्या चौकटीत राहून विचार केला जाणार आहे.

अनिवासी भारतीय नागरिकत्वाच्या अर्जांवर पूर्ण चौकशी करून निर्णय घेतले जातात. सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. भारतविरोधी कृत्यांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या नागरिकांना अनिवासी भारतीय नागरिकत्व दिले जाणार नाही. पण इतरांच्या अनिवासी भारतीय नागरिकत्वाच्या अर्जांचा विचार होऊ शकतो, असे संकेत भारत सरकारने दिले आहेत.

अनिवासी भारतीय नागरिकत्वासाठी कोण अर्ज करू शकतात ?

भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार २६ जानेवारी १९५० किंवा नंतर कोणत्याही वेळी भारतीय नागरिक असलेली आणि सध्या दुसऱ्या देशाची नागरिक असलेली व्यक्ती अनिवासी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते.

ज्याचे आईवडील अथवा दोघांपैकी किमान एक पालक हे भारतीय नागरिक आहेत किंवा होते अशी परदेशी नागरिक असलेली मुले अनिवासी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात.

ज्याचे आजीआजोबा अथवा त्यांच्यापैकी एक हे हे भारतीय नागरिक आहेत किंवा होते अशी परदेशी नागरिक असलेली नातवंडे अनिवासी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात.

ज्याचे पणजी - पणजोबा अथवा त्यांच्यापैकी एक हे हे भारतीय नागरिक आहेत किंवा होते अशी परदेशी नागरिक असलेली पतवंडे अनिवासी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात.


सम्बन्धित सामग्री