Saturday, October 05, 2024 02:39:22 PM

सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (१८ सप्टेंबर) महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. दोन्ही प्रकरणं ही शिवसेनेशी संबंधित आहेत. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव गटाच्या‌ याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल याचिकेबाबतही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांचे क्रमांक अनुक्रमे १८ तसंच १९ असे आहेत.

शिवसेनेच्या दोन मोठ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असल्याने याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरही सोमवारी (१८ सप्टेंबर) सुनावणी होईल. आमदारांच्या निलंबनासंदर्भात अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=BVKietm5DA8


सम्बन्धित सामग्री