Sunday, June 30, 2024 10:02:33 AM

crowed-of-devotees-in-shiva-temples-on-the-occasion-of-first-shravani-monday
पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त शिव मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी

पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त शिव मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी ५ जोतिर्लिंग महाराष्ट्रात मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी: श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. श्रावण मासाची सुरुवात झाली आहे. २१ ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार असून संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण दिसून येते. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहे. उरलेली ७ जोतिर्लिंग अनुक्रमे सौराष्ट्रातील श्री सोमनाथ (काठियावाड), श्रीशैल येथील श्री मल्लिकार्जुन, उज्जैन येथील श्री महाकाल, कारेश्वर किंवा ममलेश्वर, हिमालयातील केदारखंडमधील श्री केदारनाथ, वाराणसी (काशी) मधील श्री विश्वनाथ येथे आहेत. हिंगोली : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यासह हिंगोली परभणी, लातूर, नांदेड, वाशिम , अकोला, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी भागातील भाविकांचाही त्यात समावेश होता. बम बम बोले... हर हर महादेव.... श्री नागनाथ महाराज की जय या जयघोषाने परिसर भक्तीमय झाला होता .तसेच पंचक्रोशीतील अनेक शिवभक्त हे अनवाणी नागनाथ मंदिरात दाखल झाले होते. नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालीय. अधिक मासापासूनच दर सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. वेरूळ : श्रावण सोमवार निमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांनी भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना गाभाऱ्यात परवानगी देण्यात आली. देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी घृष्णेश्वर हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. येवला : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेव मंदिरामध्ये सकाळपासूनच शिवभक्तांचे गर्दी बघण्यास मिळाली पहाटेच महादेवाच्या मूर्तीला तसेच शिवलिंगाला दुग्धाभिषेक करत पूजाविधी करण्यात आला. जळगाव : श्रावण मासानिमित्त जय भवानी ग्रुप तर्फे जळगाव मधील भवानी मंदिर ते रामेश्वरम पर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात ही कावड यात्रा जळगाव ते रामेश्वर पर्यंतचा प्रवास करून या ठिकाणी भाविक महादेवाचे दर्शन घेणार असून मोठ्या भक्तीमय वातावरणात ही कावड यात्रा जळगावातून रामेश्वरम येथे रवाना झाली आहे यामध्ये अनेक शिवभक्तांनी या कावड यात्रेत आपला सहभाग नोंदवला होता.


सम्बन्धित सामग्री