मुंबई : देवदत्त पडिक्कल, प्रसिध कृष्णा आणि अभिमन्यू ईश्वरन 2024-25 विजय हजारे करंडकाच्या नॉकआउट फेरीत आपापल्या संघात सहभागी होतील, विजय हजारे करंडक 9 जानेवारीपासून वडोदऱ्यात सुरू होत आहे. विजय हजारे करंडकासाठी केएल राहुलने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर वॉशिंग्टन सुंदर तामिळनाडूने सेमीफायनल गाठल्यास त्यावेळी संघात सामील होऊ शकतो.
पडिक्कल आणि प्रसिध कृष्णा हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघात होते. दोन्ही खेळाडू बुधवारी (08-01-2025) ऑस्ट्रेलियावरून रावण झाले आहेत. तर अभिमन्यूला एक दिवस आधी प्रवासाची परवानगी देण्यात आली. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने त्याचा उड्डाणाचा कार्यक्रम बदलून वडोदऱ्यातील संघाशी लवकर जोडण्यासाठी सिंगापूर आणि अहमदाबाद मार्गे उड्डाणाची व्यवस्था केली.
प्रसिध आणि पडिक्कल 10 जानेवारीपर्यंत कर्नाटक संघात सामील होतील. ते 11 जानेवारीच्या उपांत्यपूर्वफेरीच्या आधी कर्नाटक संघाशी जोडले जातील. पडिक्कल, जो सुरुवातीला बॉर्डर-गावसकर मालिकेपूर्वीच्या भारत अ संघाचा भाग होता, त्याला रोहित शर्माच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले. त्याने पर्थमध्ये भारताच्या 295 धावांच्या विजयात भाग घेतला. त्याने दोन्ही डावात मिळून मात्र 23 धावा केल्या. पण त्यानंतरच्या कसोटी सामन्यांसाठी निवडले गेलं नाही.