मुंबई : गेली ८ दशके आपल्या अलौकिक, चिरतरुण आणि चिरस्मरणीय स्वरांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिवगंत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर. त्यांनी गायलेली गीते म्हणजे संगीत क्षेत्रातला स्वर-चमत्कारच! त्यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त माणिक निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत ‘तुला दंडवत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांनी गायलेल्या फक्त मराठी चित्रपट गीतांवर आधारित हा पहिलाच कार्यक्रम आहे.
ह्रदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, दादा चांदेकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, वसंत देसाई, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम, भास्कर चंदावरकर, यशवंत देव, प्रभाकर जोग, सलील चौधरी, मुहम्मद शफी अशा अनेक नामवंत संगीतकारांकडे त्यांनी मराठी चित्रपट गीते गायली. त्यांनी गायलेली सारी गाणी लोकप्रिय आहेतच शिवाय त्या काळात चित्रपट आणि त्यातील गाणी खूप गाजली. काही चित्रपटात त्यांनी गाण्याबरोबरच भूमिकाही केल्या होत्या. लावणी, शौर्यगीते, भक्तिगीते, भावगीते, पाळणा गीते, गवळण, अभंग असे संगीताचे सारेच प्रकार आणि त्यावर चढलेला लतादीदींच्या अपूर्व सुंदर स्वरांचा आविष्कार रसिक संगीतप्रेमींना नवोदित, प्रतिभावंत गायकांच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
तरुण गायक-संगीतकार मंदार आपटे, सुमधुर गायिका पल्लवी पारगावकर, तन्वी अरुण आणि विद्या करळगीकर यांच्यासह कार्यक्रमाचे निवेदन अक्षता विचारे करणार आहेत. ‘माणिक एन्टरटेन्मेंट’चे निर्माते, दिग्दर्शक अतुल अरुण दाते या कार्यक्रमानिमित्त रसिकांशी संवाद साधणार आहेत तसेच अमेय ठाकूरदेसाई, झंकार कानडे, अक्षय कावळे, हर्ष परमार, जयंत बगाडे, प्रणव हरिदास असा अप्रतिम वादकांची साथ कार्यक्रमाला लाभली आहे. शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे हा कार्यक्रम होणार आहे.