मुंबई : पर्यावरणप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष अजित पवार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका अभिनेत्याने प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे.
सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. कधी विनोदी कलाकार तर कधी महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपटांतून खलनायकाची भूमिकाही केली आहे. वेगवेगळ्या भूमिका करुन लोकप्रिय झालेले सयाजी शिंदे त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठीही ओळखले जातात.