Thursday, June 27, 2024 08:19:25 PM

सखी गोखले बॉलिवूडच्या अग्नीमध्ये झळकणार

सखी गोखले बॉलिवूडच्या अग्नीमध्ये झळकणार

मुंबई, ८ मे २०२४, प्रतिनिधी : अभिनय, कला आणि अनेक गोष्टींची सांगड घालत काम करणारी अभिनेत्री, लेखिका म्हणून सखी गोखले कायम चर्चेत असते. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ पासून सुरु झालेला सखीच्या अभिनयाचा प्रवास आता बॉलिवुडमध्ये येऊन पोहचला आहे.  आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिनानिमित्त ‘अग्नी’  चित्रपटाचा पोस्टर प्रसिद्ध झाला. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले देखील दिसणार आहे. सखीने आजपर्यंत अनेक नाटकात, चित्रपटात, मालिकेत काम केलं आहे आणि आता सखी ‘अग्नी’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. २०२४ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवुड गाजवलं आणि आता सखी देखील त्याचा एक भाग होणार आहे. अग्नीमध्ये सखीच्या सोबत अनेक बडे कलाकार दिसणार असून यात प्रतीक गांधी,  जितेंद्र जोशी,  सई ताम्हणकर,  देव्येंदू,  सयामी खेर यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

अग्नी बद्दल बोलताना सखी म्हणते "अग्नीचं चित्रीकरण करणं हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. अनेक बड्या कलाकारांच्या सोबतीने यात काम करता आलं आणि हा निव्वळ योगायोग होता म्हणून सेटवर आपली जवळची लोकं असल्यासारखं वाटलं. अग्नीचे दिग्दर्शक राहुल ढोलाकिया यांच्यासारख्या उत्तम दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली हा अनुभव देखील सुंदर होता. अग्नीमध्ये माझं सगळ्यात जास्त काम हे देविंद्यूसोबत आहे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव भारी होता. सहकलाकार म्हणून तो कमालीचा कलाकार आहे. प्रतीक गांधी, सई ताम्हणकर आणि जितू दादा यांच्या सोबत एकत्र येऊन काम करतानाचा अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही. सगळ्यांच्या सोबतीने मी सुद्धा अग्नीसाठी तितकीच उत्सुक आहे"

सखी अभिनयाच्या सोबतीने एक अव्वल कलाकार देखील आहे. सखी अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम फोटोग्राफर देखील आहे. २०१८ मध्ये तिने आर्ट क्युरेशनमध्ये मास्टर केलं असून अभिनयाच्या सोबत सखी स्वतःची आवड जपत अनेक काम करताना दिसते. आगामी काळात सखी अजून काय काय काम करणार हे बघणं उत्सुकतेच असणार आहे.


सम्बन्धित सामग्री