Saturday, October 05, 2024 02:22:39 PM

अभिनेत्री राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा दणका!

अभिनेत्री राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा दणका

नवी दिल्ली , २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पूर्वाश्रमीचा पती आदिल दुर्रानी याचे अश्लिल व्हिडिओ सार्वजनिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत हिला अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुढील चार आठवड्यात आत्मसमर्पण करा, असे निर्देश न्यायालयाने राखीला दिले आहेत.

आदिल दुर्रानी याने गुन्हा दाखल केल्यानंतर राखीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ती दुबईत वास्तव्याला गेली होती. डिसेंबर २०२२ मध्ये राखी सावंत हिने दुर्रानीसोबत लग्न झाल्याचा दावा केला होता. या लग्नाला दुर्रानी यानेही दुजोरा दिला होता. याच्या काही दिवसानंतर राखीने आदिलवर हिंसाचार आणि छळवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यावर आदिल याने राखीवर त्याचे अश्लिल व्हिडिओ लिक केल्याचा आरोप केला होता. दुर्रानी याच्या आरोपानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३४आणि कलम ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ए नुसार राखीविरोधात गुन्हे दाखल केले होते. व्हाटस्अप आणि इतर डिजिटल माध्यमांतून आपले अश्लिल व्हिडिओ जारी करण्यात आले असल्याचा दुर्रानी याचा दावा आहे.


सम्बन्धित सामग्री