Sunday, July 07, 2024 12:34:35 AM

नाट्यसंमेलनापूर्वी पाठक सरांची कार्यशाळा

नाट्यसंमेलनापूर्वी पाठक सरांची कार्यशाळा

सोलापूर, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नाट्यशास्त्रतज्ज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांची रंगभूमी प्रबोधन कार्यशाळा सोलापूरमध्ये २५ डिसेंबर पासून सुरू झाली आहे. सहा दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसह सोलापुरातील युवा रंगभूमी कलाकारांसाठी नाट्यलेखन ते निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाच्या घटकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रा.देवदत्त पाठक, नाट्य शिक्षक मिलिंद केळकर तसेच गुरूस्कूल गुफानची टीम रंगप्रेमींना मार्गदर्शन करत आहे.

शाळा-शाळांतून रंगमंचीय खेळांची सुरुवात झाली तर रंगभूमी अधिक समृद्ध होईल. यासाठी शाळा तिथे रंगभूमी प्रबोधन कार्यशाळा घेणे आणि त्यात संबंधित शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थी यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. या प्रयोगांमुळे रंगभूमीचा विस्तार अधिक चांगल्या प्रकारे होईल, असे प्रा. देवदत्त पाठक म्हणाले.

सोलापूर येथे सुरू असलेल्या या रंगभूमी प्रबोधन कार्यशाळेसाठी सोलापूरचे रंगकर्मी विजयकुमार साळुंखे, कृष्णा हिरेमठ तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी रात्रंदिवस झटत आहेत. या कार्यशाळेतून किमान १००० शिक्षकांना प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. त्यातून रंगभूमी अधिक सशक्त आणि सक्षम होईल, असे प्रतिपादन विजय साळुंखे यांनी केले आहे. लवकरच होणार असलेल्या १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना ही अनोखी संधी असणार आहे. यातूनच पुढे नाट्यदिंडी, बालनाट्य, नाट्यछटा, पथनाट्य, नाट्यवाचन या प्रयोग निर्मितीसाठी शिक्षकांना उपयोग होणार आहे.


सम्बन्धित सामग्री