Saturday, July 06, 2024 11:25:20 PM

नव्वदीच्या झाल्या गानसम्राज्ञी आशा भोसले

नव्वदीच्या झाल्या गानसम्राज्ञी आशा भोसले

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे नाव संगीतविश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. झगमगत्या जगात त्यांनी जवळपास आठ दशकांत उत्कृष्ट आणि अगणित गाणी गायली आहे. आपल्या आवाजाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. आशा भोसले यांची खोडकर शैलीतीली गाणी आणि प्रेमगीते आजही गुणगुणली जातात.

प्रदीर्घ कारकिर्दीत आशा भोसले यांनी वीस भाषांमध्ये सोळा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. चित्रपटसृष्टीतील या ज्येष्ठ गायिकेचा आज म्हणजे शुक्रवार ८ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस. आशा भोसले आज ९० वर्षांच्या झाल्या. नव्वदीच्या झाल्या तरी आजही आशा भोसले प्रेक्षकांसमोर उभे राहून गाणी गाणे पसंत करतात. स्वतः स्वयंपाक करून तेच जेवण जेवतात. बाहेरचे खाणे टाळतात.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले नऊ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. वडिलांच्या अकाली निधाननंतर संपूर्ण मंगेशकर कुटुंब पुण्यातून आधी कोल्हापूरमध्ये नंतर मुंबईत स्थलांतरित झाला. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी काम करायला सुरुवात केली. जवळपास ८० वर्षे मनोरंजनसृष्टीसाठी गाणी गात असलेल्या आशा भोसले यांचा आजही फिटनेस जपण्यावर भर आहे. वय हे विचार करण्यावर अवलंबून आहे. मनातून निराश झालेली आणि थकलेली व्यक्ती लवकर वृद्ध होते, असे आशा भोसले सांगतात. प्रेक्षकांकडून मिळणारी दाद प्रेरणादायी असते, असेही त्या सांगतात. जोपर्यंत गाणी गात राहण्याची क्षमता आहे तोपर्यंत गात राहणार, असे आशा भोसले यांनी सांगितले. त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे जाहीर आभार मानले.

सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सोशल मीडियातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री