Sunday, September 08, 2024 06:54:52 AM

Crime
'मंदिरात अत्याचार करणाऱ्यांना फाशी व्हावी'

शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

मंदिरात अत्याचार करणाऱ्यांना फाशी व्हावी

नवी मुंबई : शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आयोग पाठपुरावा करेल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी सांगितले. पीडित महिलेच्या कुटुंबाची त्यांनी नवी मुंबईतील घरी भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. 

काही दिवसांपूर्वी ही घटना समोर येताच राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली. पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आणि आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आरोपींची अटक, तपास या दरम्यान चाकणकर पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या.

चाकणकर यांनी या दुर्दैवी घटनेतून सावरणाऱ्या  पीडित कुटुंबाची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. आई वडील, बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाची पार्श्वभूमी समजून घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत कुटुंबियांना माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करावे अशा सूचना पोलिसांना दिल्या. आरोपीवर कठोर कलमे लावून लवकर आरोपपत्र दाखल करावे असेही पोलिसांना सांगितले आहे. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. आरोपींना फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. ही महिला सासरच्या छळाला सामोरी जात होती, त्यांच्यावरही योग्य त्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. पीडित महिलेच्या कुटुंबाला, तिच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठीही आयोग प्रयत्न करेल असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.


सम्बन्धित सामग्री