गोंदिया : शहरातील रेलटोली परिसरात असलेल्या प्रसिद्ध रामदेवरा मंदिरात मध्यरात्री चोरीची मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा तोडून चांदीची मूर्ती आणि चांदीच्या पादुका असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
रामदेवरा मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. फिर्यादीनुसार, हरिलालभाई राठोड (वय ६२, रा. गड्डाटोली) यांनी पोलिसांना माहिती दिली की, रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून गर्भगृहाचा कोंडा तोडला. चोरट्यांनी ४ किलो वजनाची चांदीची मूर्ती आणि १ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राप्त फुटेजमध्ये अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील एक आरोपी दिसत असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या गंभीर चोरीप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुमेद खोपीकर तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने चार विशेष पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा वेगाने शोध सुरू आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
गोंदिया शहरात याआधीही मंदिर व इतर धार्मिक स्थळांवर चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मंदिर प्रशासनालाही सुरक्षा उपाय वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या घटनेमुळे रामदेवरा मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस लवकरात लवकर आरोपीला पकडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.