विरार : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वात विरारमध्ये मतदारांना पैसे वाटप सुरू होते, असा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. पैसे वाटप करणाऱ्यांना पकडले त्यावेळी हॉटेलमध्ये विनोद तावडे होते अशी माहिती बविआच्या कार्यकर्त्यांनी दिली. विनोद तावडेंचे फोन रेकॉर्ड तपासावे तसेच हॉटेलच्या आणि भोवतालच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजची पाहणी करावी अशीही मागणी बविआकडून सुरू आहे.
विनोद तावडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या नियमांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. भाजपाने या प्रकरणी तपास होईल आणि सत्य बाहेर येईल, असे सांगितले. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तावडे आचारसंहितेचे उल्लंघन करतील असे वाटत नाही; अशी सावध प्रतिक्रिया दिली. तर तावडेंनी स्वतःच फोन करुन माफी मागितली, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.