Tuesday, April 08, 2025 12:51:08 PM

तुम्हालाही मोमोज खायला आवडतात? या शहरात मोमोजच्या फॅक्टरीत फ्रिजमध्ये सापडले विचित्र प्राण्याचे डोके!

तुम्हीही मोमोज आणि स्प्रिंग रोल खाण्याचे शौकीन असाल तर सावधान. मोमोजच्या कारखान्यामधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यावर तुम्ही मोमोज खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल.

तुम्हालाही मोमोज खायला आवडतात या शहरात मोमोजच्या फॅक्टरीत फ्रिजमध्ये सापडले विचित्र प्राण्याचे डोके

Shocking Video From Momo's Factory : तुम्हालाही मोमोज आणि स्प्रिंग रोल खायला आवडत असतील तर, ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. एका मोमोज कारखान्यावर छापा टाकला असता धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. तिथे कुजलेल्या भाज्या, बुरशी लागलेली कोबी आणि खराब झालेले तेल यांपासून मोमोज बनवले जात होते. एवढेच नाही तर, मोमोजच्या मसाल्यातही किडे सापडल्याचे समोर आले आहे. यासोबतच फ्रीजमध्ये एका प्राण्याचे छिन्नविछिन्न शीर सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याशिवाय कारखान्यातील भांड्यांमध्ये काही प्रमाणात मांसही सापडले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.

पूर्वीपासून घरातील वडिलधारे लोक घरचे जेवण चांगले, असे आपल्याला सांगत आले आहेत. मात्र, थोडासा 'चेंज' म्हणून, तर कधी गरज म्हणून हल्ली लोकांचे बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या बाहेर विकण्याच्या उद्देशाने बनवलेल्या अन्नाच्या स्वच्छतेचा आणि शुद्धतेचा काहीही भरवसा देता येत नाही. अनेकदा खराब स्थितीत बनवलेल्या विकतच्या अन्नामुळे लोक अनेकदा आजारी पडतात. मात्र, चटकदार चवीमुळे पुन्हा एकदा अनेकांची पावले बाहेर वळतात. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील मोहाली येथील आहे. या भागातील एका कारखान्यातून बाहेर पडणारा कचरा पाहून लोकांना संशय आला. आत जाऊन पाहिलं तर परिस्थिती अतिशय भयावह होती. घाणीत मोमोज आणि स्प्रिंग रोल बनवले जात होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे.

हेही वाचा - Romance Scams: बनावट डेटिंगचा सुळसुळाट; 'बाबू-शोना' करत प्रेमाचे नाटक करणाऱ्यांपासून सावधान..! अनेक भारतीयांची फसवणूक

या कारखान्यात वापरण्यात येणारा कोबी पूर्णपणे खराब झाला होता. त्यावर बुरशी चढली होती. भांडी वॉशरूममध्ये ठेवली होती आणि वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले जात होते. गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात तयार होणारे मोमो आणि स्प्रिंग रोल शहरभरातील गाड्या आणि दुकानांना पुरवले जात होते. या संशयास्पद स्थितीची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. येथे कुत्र्यासारख्या प्राण्याचे डोके फ्रीजमध्ये सापडल्याचे सांगण्यात आले. ते जप्त करण्यात आले असून या डोक्याची ओळख पटवण्यासाठी ते पशुवैद्यकीय विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभाग सतर्क झाले आहेत. कारखान्यात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचीही चाचपणी केली जात आहे. पोलिसांनी कारख्यान्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच कारखाना मालक व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा - Santosh Deshmukh Murder Case : "माझं काही बरं-वाईट झालं तर.. म्हणत वडिलांनी सांगितलं, 'त्याचा' फोन होता," लेकीचा काळीज पिळवटणारा जबाब


सम्बन्धित सामग्री