'Child's testimony cannot be rejected': लहान मुलीच्या साक्षीच्या पुराव्याचे मूल्यांकन करताना न्यायालयाने घ्यावयाची एकमेव खबरदारी म्हणजे असा साक्षीदार विश्वासार्ह असावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासह साक्षीदार लहान मूल असेल तरी त्याची साक्ष नाकारता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. साक्षीदारासाठी किमान वयाची कोणतीही तरतूद नाही, असेही ऐतिहासिक विधान न्यायालयाने केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या आठवड्यात म्हटले आहे की, बाल साक्षीदाराची साक्ष नाकारता येत नाही. लहान मुलीच्या साक्षीला ग्राह्य न मानता आरोपीला निर्दोष सोडण्याचा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. 7 वर्षांच्या मुलीने साक्ष दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एका पुरूषाला पत्नीची हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
काय होते प्रकरण?
या प्रकरणात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली होती. तो त्याच्या पत्नीचा खून करत असताना त्याच्या सात वर्षांच्या मुलीने सगळं दृश्य पाहिलं होतं. याप्रकरणी न्यायालयाने मुलीच्या साक्षीच्या आधारावर निकाल दिला आहे. हा निकाल देताना आरोपीच्या वकिलांनी मुलीच्या वयाचा उल्लेख करत तिच्या साक्षीवर आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाने म्हटलं की अशा प्रकरणांमध्ये साक्षीदारासाठी वयाची मर्यादा नाही. एखादं मूल साक्ष देण्यास सक्षम असेल तर, त्या मुलाची साक्ष इतर साक्षीदारांप्रमाणेच वैध असेल.
न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, बाल साक्षीदार आणि त्याची साक्ष इतरांप्रमाणेच आहे. परंतु, तो विश्वासार्ह असला पाहिजे, एवढीच अट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते, पुरावा कायदा साक्षीदारासाठी कोणतेही किमान वय नमूद करत नाही.
हेही वाचा - ‘विवाह अपयशी ठरला म्हणजे जीवन संपलं असं होत नाही,’ घटस्फोट मंजूर झाल्यावर तरुण जोडप्याला 'सर्वोच्च' सल्ला
पत्नीची गळा दाबून हत्या
हे 2003 चं प्रकरण आहे. मध्य प्रदेशमधील सिंगराई गावातील बलवीर सिंह नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी बीरेंद्र कुमारी हिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर बलवीरने त्याच्या बहिणीच्या मदतीने पत्नीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले. मृत महिलेचे नातेवाईक भुरा सिंह यांना या अंत्यसंस्कारांची माहिती मिळाली आणि त्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं. मृत बीरेंद्र कुमारी यांची मुलगी राणी ही या हत्येची साक्षीदार होती. तिने न्यायालयाला सांगितलं की, तिच्या वडिलांनीच आई बीरेंद्र कुमारी यांची गळा दाबून हत्या केली आहे.
"लहान मुलगी साक्षीदार असल्याच्या आणि तिने दिलेल्या साक्षीच्या पुराव्याचे मूल्यांकन करताना न्यायालयाने घ्यावयाची एकमेव खबरदारी म्हणजे असा साक्षीदार विश्वासार्ह असला पाहिजे. कारण, लहान मुलांना एखादी गोष्ट शिकवून बोलायला लावली जाऊ शकते किंवा बोलण्यापासून थांबवलेही जाऊ शकते. अशा शिकवणीला लहान मुले बळी पडण्याची शक्यता असते," असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पुरावा कायदा साक्षीदारासाठी किमान वयाची तरतूद करत नाही.
"बाल साक्षीदाराच्या पुराव्याचे मूल्यांकन करताना न्यायालयाने फक्त एकच खबरदारी घ्यावी की, अशा साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह असली पाहिजे कारण मुले शिकवणीला बळी पडण्याची शक्यता असते," असे खंडपीठाने म्हटले आहे.
बाल साक्षीदाराच्या साक्षीचे कौतुक करताना, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अशा साक्षीदाराचा पुरावा त्याची स्वेच्छेने व्यक्त केलेली अभिव्यक्ती आहे का आणि ती साक्ष इतरांच्या प्रभावातून निर्माण झालेली नाही आणि साक्ष आत्मविश्वास निर्माण करते का, याचे न्यायालयांनी मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने बाल साक्षीदारांना धोकादायक देखील म्हटले आहे. कारण ते प्रभावित होण्याची शक्यता असते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जबाब नोंदवताना ट्रायल कोर्टांनी या पैलूबद्दल सतर्क असले पाहिजे.
बाल साक्षीदार धोकादायक ठरू शकतात, यासाठी खातरजमा आवश्यक
'बाल साक्षीदारांना धोकादायक साक्षीदार मानले जाते. कारण, ते लवचिक असतात आणि सहजपणे प्रभावित होऊ शकतात. म्हणणे बदलू शकतात, आधीपेक्षा नवीन किंवा वेगळे काहीतरी बोलू शकतात. त्यामुळे न्यायालयांनी अशी शिकवणी देण्यात आली आहे का, याची शक्यता तपासली पाहिजे आणि खातरजमा करून झाल्यावरच ती स्वीकारली किंवा नाकारली पाहिजे. जर न्यायालयांना, काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर, असे आढळून आले की, अभियोक्ता पक्षाकडून बाल साक्षीदाराचा वापर गुप्त हेतूंसाठी करण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नसेल, तर न्यायालयांनी आरोपीचा अपराध किंवा निर्दोषपणा निश्चित करण्यासाठी अशा साक्षीदाराच्या विश्वासार्ह साक्षीवर अवलंबून राहावे. या संदर्भात आरोपीने कोणतेही आरोप न केल्यास, मुलाला शिकवणी देण्यात आली आहे की नाही, याचा निष्कर्ष त्याच्या साक्षीच्या मजकुरावरून काढता येतो," असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा - 'पप्पांनी मम्मीला मारलं, मग...' 4 वर्षांच्या मुलीने काढलेल्या चित्रामुळे आईच्या खुनाचा उलगडा, पोलिसही अवाक्