मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवारी आणि रविवारी झालेल्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शाह यांची भेट घेतली. ही चर्चा तब्बल तासभर झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याविषयी तक्रार मांडली. अर्थखात्याकडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये असलेल्या मंत्र्यांच्या फायली वेळेत मंजूर केल्या जात नाहीत. यामुळे आमदारांच्या विकासकामांत अडथळे येत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे स्पष्ट केले.
यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद देत, 'महायुतीसाठी तुम्ही जे केले ते कधीच दुर्लक्षित केले जाणार नाही', असे म्हटले.
गोगावले यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून तात्काळ मुंबई गाठली:
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित राहिल्याने बैठकीचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे, ज्यामुळे शिंदे आणि शाह यांच्यातील खाजगी चर्चा आणखी गूढ बनली आहे. या बैठकीनंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले यांना मुंबईला तातडीने बोलावले. गोगावले यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून तात्काळ मुंबई गाठली, ज्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत नवीन सस्पेन्स निर्माण झाला आहे.
पालकमंत्रीपदावरून महायुतीत तिढा:
सध्या, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांवरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. भरत गोगावले यांना रायगडची जबाबदारी दिली जाणार का? की आदिती तटकरे यांना पुन्हा संधी मिळणार? हे लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यानंतर ते लगेचच मुंबईत आले आणि त्यांनी या बैठका घेतल्यामुळे, महायुतीतील अंतर्गत समीकरणं पुन्हा बदलू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
महायुतीत कोणतीही धुसफूस नाही:
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'महायुतीमध्ये कोणतीही धुसफूस नाही', असं जरी वक्तव्य केलं असलं तरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सतत होणाऱ्या गुप्त बैठकांमुळे, अर्थ मंत्रालयाकडून येणाऱ्या तक्रारी आणि पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून येत असल्याचे संकेत आहेत. सध्या राजकीय वर्तुळांमध्ये एकच चर्चा रंगत आहे आणि ते म्हणजे, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या तक्रारीनंतर आता अर्थखात्याचं राजकारण तापणार का? आणि रायगडवर कोणाचा झेंडा फडकणार?' याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.