तुळजापुर : महाराष्ट्राच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या तुळजापुरात एका खळबळजनक प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुळजापूर येथील प्रसिद्ध तुळजाभवानी देवीच्या मंदिरात ड्रग्जचा बाजार चालल्याचा गंभीर आरोप मंदिराचे पुजारी करत आहेत. त्याचबरोबर, तुळजापुरात ड्रग्ज तस्करी ही अडीच वर्षांपासून सुरू असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
पुजाऱ्यांचा आरोप आहे की, तुळजाभवानी देवीच्या पवित्र स्थानावर ड्रग्ज तस्करी चालवणाऱ्यांनी मंदिराच्या परिसरात धंदा सुरू केला आहे. यावरून मंदिराच्या परिसरात असलेल्या कायद्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संदर्भात पुजाऱ्यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की, पोलिसांनी या तस्करीविरुद्ध कारवाई करण्याऐवजी या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना संरक्षण दिलं आहे.
हेही वाचा: Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा वाचाळ अधिकाऱ्यांना सज्जड दम
त्याचबरोबर पोलिसांनी पांघरुण घातल्याचा आरोप मंदिरातील पुजाऱ्यांनी केलाय. ड्रग्ज तस्करांना संरक्षण देण्यामुळे तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेट अव्याहतपणे चालू आहे,” असं पुजाऱ्यांनी सांगितलं. तसेच, “जर या प्रकरणात तत्काळ कारवाई झाली नाही, तर आम्ही तुळजापुर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
तुळजापुरात ड्रग्ज रॅकेटचं मुंबईशी कनेक्शन असल्याचेही बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील काही ड्रग्ज तस्कर तुळजापुरातील स्थानिक तस्करांशी कनेक्टेड आहेत आणि ते येथे ड्रग्ज पाठवतात. यामुळे स्थानिक पोलिस यंत्रणा आणि प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
मंत्रालय आणि पोलिस प्रशासन या प्रकरणावर तपास सुरू करण्याची तयारी करत असून लोकांनी या प्रकरणात योग्य कारवाईची मागणी केली असून आता या प्रकरणात नक्की काय समोर येणार हे पाहून महत्वाचं ठरणारे त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाचा कसा छडा लावणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.