Connect with us

Blog

शरद पवार ते ‘पवार साहेब’

Published

on

शरद पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती मधील काटेवाडी येथे झाला.आजच्या देशाच्या राजकारणात शरद पवारांइतका अनुभवी आणि सक्रिय नेता कदाचितच पहायला मिळेल. प्रत्यक्ष राजकारणात एकही निवडणूक न हरलेल्या शरद पवारांचा आज 78 वा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचा काटेवाडी ते मंत्री पदापर्यंतचा प्रवास.

old_to_new.jpg

कॉलेज जीवनातूनच राजकीय प्रवासाला सुरवात आणि यशवंतराव चव्हाणांचे सानिध्य

1956 साली शरद पवार यांनी शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.

पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवार यांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

पहिली विधानसभा आणि राज्यमंत्रीपद

1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला, त्यावेळी ते अवघ्या 29 वर्षाचे होते. 1972 आणि 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते.

खऱ्या राजकारणाची सुरुवात आणि पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
शरद पवार हे राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्या खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली ती वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना. कारण त्यावेळी काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर ‘पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली.

18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते.

विरोधी नेतेपद

1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकार बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

दिल्लीकडे वाटचाल

1984 सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता. मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले.

मार्च 1985 ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

 

परत विधानसभा आणि दुसऱ्यांदा मुखमंत्री

1987 साली 9 वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून 1988 मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.

शिवसेना भाजपा युतीनंतरही तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या.शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला.भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले.राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च १९९० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.

हुलकावणी देऊन गेलेले पंतप्रधान पद

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला.पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली.त्यामुळे पक्षाची धुरा हातात घेऊन पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये पी .व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचेही नाव शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

केंद्रीयमंत्री पदावरून पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री 
नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली.मात्र राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.

चौथ्यांदा मुख्यमंत्री आणि गाजलेला वादग्रस्त कार्यकाळ

पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत २५७ लोक ठार तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले.

३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले.

प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला.
जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला.
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.

दिल्लीची तिसरी फेरी

1996च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. जून 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तिथे त्यांचा पराभव झाला.

1998च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला 10 जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार 12 व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

 

काँग्रेसशी बंडखोरी आणि सोनिया गांधींना आव्हान

sharad_pawar_sonia_gandhi.jpg

 

12वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे 1999 मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, ’13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणत्याही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,’उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या 98 कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेरील कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयांच्या अस्मितेशी निगडित आहे’ या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना

ncp1.jpg

 

काँग्रेस पार्टीमध्ये केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवारांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला त्यानंतर 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

पुन्हा केंद्रीय मंत्री

2004 मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. 22 मे 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 29 मे 2009 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली.

राजकारणाशिवाय खेळातही रुची

sharad_pawar_cricket.jpg

 

राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. 29 नोव्हेंबर 2005 रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. 1 जुलै 2010 रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.

2010 नंतर पक्ष संघटनेच्या कामासाठी शरद पवारांनी मंत्रिपद सोडले आणि थेट निवडणूक लढण्याऐवजी राज्यसभेवर निवडून गेले. बारामती मतदार संघातुन लोकसभेसाठी मुलगी सुप्रिया सुळे आणि विधानसभेसाठी पुतणे अजित पवार यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले, मात्र 2014 च्या मोदी लाटेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील सत्ता गेली.

शरद पवारांइतका जाणकार आणि अनुभवी नेता कदाचितच देशाच्या राजकारणात पहायला मिळेल,त्यामुळे 2017 मध्ये त्यांना पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

padmwibhushan.jpg

 

वयाच्या 78 व्या वर्षीही त्यांची काम करण्याची शैली एखाद्या तरुण राजकारण्याला लाजवेल अशीच आहे. आजही देशात पंतप्रधान पदाच्या उमेद्वाराविषयी चर्चा होते तेव्हा शरद पवारांचे नाव घेतले जाते.राजकारणाचे योग्य भाकीत करणाऱ्या पवारांनी मागच्या वाढदिवसाला सर्व विरोधकांना एकत्र स्टेजवर आणले होते. त्यामुळे देशात जर कोणाला बहुमत प्राप्त नाही झाले तर शरद पवार हे एकमेव असे व्यक्तिमत्व मानले जाते जे देशाच्या कानाकोपऱ्यातील पक्षांना एकत्र आणू शकतील.

 

– अक्षय भुजबळ
akshbhuj26@gmail.com )

Continue Reading
Comments

Blog

सामान्य कार्यकर्ता ते लोकनेता; गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षमय प्रवास…

Published

on

By

महाराष्ट्रातील भाजपचा मुख्य चेहरा अशी ओळख असणारे गोपीनाथ मुंडे यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची प्रतिभावानं ओळख निर्माण करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांची ही वाटचाल तशी बरीच अडचणीची पण उल्लेखनीय होती. त्यांचा एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रातील एक कॅबिनेट मंत्री असा प्रवास देखील संघर्षमय होता.
परळ तालुक्यातील नाथ्रा या लहानशा गावात हालाखीची परिस्थिती असलेल्या कुटूंबात 12 डिसेंबर 1949 साली जन्माला आलेला हा मुलगा एक दिवस लोकनेता होईल याचा कोणी विचार पण केला नव्हता. त्यामागे कारण देखील तसेच होते. शिक्षणात गोपीनाथ मुंडे तसे इनमिनच होेते आणि कोणीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नव्हती.
gopinath_munde_4.jpg
पुढे शिक्षणासाठी परळमधून बाहेर पडत त्यांनी आपले पदवीचे (बी.कॉम) शिक्षण आंबेजोगाईतून पूर्ण केले. त्यातूनच ते पुढे विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. विद्यार्थी चळवळीत सक्रियपणे काम करणाऱ्या मुंडेची भेट पुढे प्रमोद महाजन यांच्याशी झाली. त्यानंतर स्वकर्तुत्वावर त्यांची वाटचाल अत्यंत प्रखर झाली. काही काळाने प्रमोद महाजन यांच्या बहीण प्रज्ञा महाजन यांच्याशी गोपीनाथ मुंडे हे विवाहबंध झाले.आंबेजोगाईमध्ये शिक्षण घेतानाच त्यांची एकमेकांशी ओळख होती.
   gopinath-munde_3.jpg
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबीरात सहभागी झाल्यानंतर ते पुण्याच्या संघाच्या शाखेचे कार्यकारी समितीचे सदस्य बनले. त्यातून त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील मुंडेचे स्थान अधिक प्रखर झाले.
मुंडेच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजप सत्तेत- 
1980 ला त्यांना भाजपच्या युवा मोर्चाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष पद मिळाले. राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर आमदार असलेले मुंडे 1991 ते 1995 साली विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी देखील होते. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यात भाजप-शिवसेना युतीला चांगले यश मिळाले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले आणि युतीने सरकार स्थापन केले.
gopinath-munde_5.jpg
माफीयाराज मोडीत – 
या सरकारमध्ये मुंडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदी होते, तर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री पदी होते. या काळात मुंडेनी महाराष्ट्र पोलीसांना माफीयाराज संपवण्याचे आदेश दिले होते. मुंबई आणि महाराष्ट्रातील माफीयाराज संपवण्यात मुंडेची महत्वाची कामगिरी पार पाडली.  परंतु 1999 साली झालेल्या निवडणुकीत युतीला आपली सत्ता कायम राखण्यात अपयश आले.
2006 साली महाजन यांच्या निधनानंतर 2009 साली नितीन गडकरी हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाल्याने मुंडेना हे पद मिळवता आले नाही. परंतु त्यांची महाराष्ट्रावरील राजकीय पकड मजबूत होती. देशातील ओबीसी चळवळीचे नेते म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जात असे. मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी केलेल्या शिफारसीची त्यांना उत्तम जाण होती. घटनेमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा लाभ ओबीसी समाजाला मिळालाच पाहिजे असे मुंडेचे ठाम मत होते.
सत्ता आल्यास मुंडेच मुख्यमंत्री, परंतु त्याआधीच…
2014 साली लोकसभेला महाराष्ट्रात युती कायम ठेवून भाजपला भरभरुन यश मिळवून देण्यात मुंडेचा मोठा संघर्ष होता. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका देखील मुंडेच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले होते. सत्ता आल्यास मुंडेच मुख्यमंत्री असतील असे जवळपास पक्के झाले होते, परंतु त्याआधीच 3 जून 2014 रोजी दिल्लीत मुंडेचे वाहन अपघातात निधन झाले. यामुळे महाराष्ट्राला आणि देशाला एक हरहुन्नरी, कार्यक्षम नेता गमवावा लागला.
 gopinath_munde_6.jpg
निधनानंतर गोपीनाथ मुंडेच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘संघर्षयात्रा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित करण्यात आला होता. त्यातला ‘जी जी रं…’ हा पोवाडा चांगलाच गाजला होता.
वैभव गाटे.

Continue Reading

Blog

‘अवनी’च्या शिकारीने प्रश्न सुटला का?

Published

on

By

यवतमाळ मधील T1 वाघिणीचा दहशत पांढरकवडा आणि राळेगावच्या 22 गावांमध्ये होती, ही दहशत इतकी भयंकर होती की शाळेत मुलांना पाठवायला पालक घाबरतात, पाणी भरण्याला जाताना घोळक्याने जायच्या असे अनेक उदाहरण हा दहशतीचे देता येईल याचे वृत्तांकन करताना हे सगळं मी अनुभवलं पण तरी एक प्रश्न मला कायम राहिला, जर वाघीण नरभक्षक होती तर 18 पेक्षा अधिक महिने ती 13 जणांची शिकार करून न खाता निघून जात असेल तर मग ती नरभक्षक कशी?

एक वाघाच्या जेवणाचा विचार केला तर आठवड्याभरात 15 ते 20 किलो मांस तो साधारणपणे खात असेल त्यातही त्याला माणसाच्या रक्ताची चव लागली तर जंगलातील शिकारीपेक्षा तो मानवाच्या शिकारीला हापापतो, मग असं असताना 18 महिन्यांत केवळ 13 लोकांचीच शिकार होते, हे न समजण्यासारख होतं. विशेष म्हणजे यातील अनेक शिकार तिने जंगलातच केल्या. म्हणजे मानवी अतिक्रमण अतिशय सुलभतेने आणि बिनधास्तपणे तिच्या क्षेत्रात होत होते.

या सगळ्या मोहिमेला मी जवळून पाहिलं. 2 दिवस तिथे राहून याचं रिपोर्टिंग केलं. हे सगळं पाहत असताना मला ही मोहीम फार गांभीर्याने सुरू आहे असं जाणवलं नाही. वाघिणीला जेरबंद करायचं की ठार करायचं या प्रश्नाचं उत्तर न्यायालयाने दिल्यानंतर ही दबक्या स्वरात वाघिणीला ठारच केलं जाईल अशीच चर्चा जास्त होती. तरीही 47 दिवस चाललेल्या मोहिमेचा शेवट वाघिणीला ठार करून होईल असं वाटलं नव्हतं.avni2.jpg

ज्या पद्धतीने अत्याधुनिक आणि पारंपरिक साधन समुग्रीचा उपयोग या मोहिमेत होत होता त्यावरून तरी स्वाभाविकपणे वाघिणीला आणि तिच्या बछड्यांना जेरबंद करून प्राणिसंग्रहालयात हलवण्यात येईल असं वाटत होतं. असं असताना रात्री एक फोन आला आणि T1 ठार झाल्याचं कळलं आणि धक्काच बसला.

जर T1 ला ठार करून हा प्रश्न सुटणार असता तर याच स्वागत झालं असतं. मात्र हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक चिघळणार आहे, आणि याला वाघ जवाबदार आहे की मानव या प्रश्नाचं उत्तर पुन्हा अनुत्तरीत राहणार आहे. वाघ वाचवण्याची मोहीम राबवणारे सरकार जर राजकीय लालसेने त्याच वाघाच्या जीवावर उठणार असेल तर मग वाघिणीला पण न्यायालयात बाजू मांडण्याची संधी या लोकशाहीने देणे आवश्यक आहे.avni_cubs.jpg

अवनीच्या मृत्यूनंतर बछड्यांचा प्रश्न आता अधिक गंभीर होणार आहे. T2 वाघबरोबरच जंगलातील इतर प्राणी आणि मानव यांचा धोका त्या लहानग्या जीवांना आहे. वनविभागाचा भरवसा नसल्याचा समज सामान्य नागरिकांमध्ये आहे. ‘जय’ सोबत जे झालं ते यांच्या सोबत घडलं तर नावीन्य नाही, उद्या बछडे सापडले नाही, तर तो दोष वन विभाग किंवा सरकार चा नसेल का?

T1 च्या निमित्ताने जंगलातील अतिक्रमन आणि वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला, पण या प्रश्नाला आजच गांभीर्याने घेणं आवश्यक आहे नाही तर वाघ आणि जंगल हे पुढच्या पिढीला दिसणार की नाही, याचा विचार करावाच लागेल.

Continue Reading

Blog

भारत-पाकिस्तान आणि शाहरूख खान

Published

on

By

90 च्या दशकात दूरदर्शनवरून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला शाहरुख खान नावाचा मुलगा भविष्यात जगातला सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत इतक्या वरच्या नंबरवर पोहोचेल असं इतरांना सोडा, खुद्द शाहरूखलाही कधी वाटलं नसेल… तो टीव्हीवर झळकत होता, तेव्हा भारतीय टीव्ही इंडस्ट्री फार मोठी नव्हती. पण ‘फौजी’ मालिकेत त्याने साकारलेला ‘अभिमन्यू राय’ हा त्या काळी लहान थोर सर्वांचाच लाडका होऊन गेला होता. स्वतः शाहरूख खानही भारतीय सैन्यात जाण्याचं स्वप्नं पाहात होता आणि त्यासाठी थोडेफार प्रयत्नही त्याने करून पाहिले होते. एकेकाळी भारतीय सैन्यात जायचं स्वप्न पाहाणारा हा तरूण आज NRI प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय, भारताच्या सेक्युलर प्रतिमेचं झगमगतं उदाहरणही बनलाय, तर दुसरीकडे विनाकारण धार्मिक तेढ बाळगणाऱ्यांच्या द्वेषाचं कारण बनलाय. महाकवी ‘होमर’ हा आमच्या भूमीतला आहे, असा वाद जगातले सात देश घालतायत. तसाच वाद शाहरूखबद्दल भारत-पाकिस्तान घालतायत.

srk_Fauji.jpg

 

शाहरूख पक्का भारतीय तर आहेच, तरी त्याच्यावर पाकिस्तानी म्हणून होणारे आरोप काही थांबत नाहीत. दिलीप कुमार यांनी ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारल्याबद्दल त्यांच्यावर भारतातून टीका झाली. शाहरूखही प्रचंड यश चाखताना तीच टीका सहन करतोय. पण त्याला पाकिस्तानी म्हणताना शाहरूख आणि पाकिस्तानचं नातं भारत कधी समजून घेऊ शकतो का हा प्रश्न आहे… त्यासाठी मुळात भारताचं पाकिस्तानाशी असणारं सनातन नातं लक्षात घ्यायला नको का?

srk12.jpg

शाहरूख खानची वांशिक मूळं वायव्य सरहद्द प्रांतातल्या पेशावर येथे आहेत. तेथे त्याचा जन्म झाला नसला, तरीही… पण त्याच्यातल्या अभिनेत्याची, एंटरटेनरची बीजंही कदाचित त्याच पेशावरमध्ये सापडू शकतात. पेशावरमधील एक प्रसिद्ध भाग आहे ‘किस्सा कहानी बाजार’… या जागेशी शाहरूखचं खास नातं आहे.

 

peshawar1.jpg

‘किस्सा कहानी बाजार’ या अजब नावामागेही रंजक इतिहास आहे. एकेकाळी भारत हा अफगाणिस्तानपर्यंत पसरला होता आणि खैबर खिंड हे भारताचा प्रवेशद्वार होतं. तेव्हा अनेक लढवय्ये, व्यापारी खैबर खिंडीचा प्रवास करून अखेर भारतात पोहोचायचे. काही दिवस या भागात मुक्काम करायचे. मग नवे कपडे खरेदी करणं, झिजलेले जोडे दुरूस्त करून घेणं इत्यादी गोष्टी चालत.

khyber.jpg

याशिवाय, त्यावेळी मनोरंजनाची साधनं फारशी नव्हती. त्यामुळे थकलेल्या या लोकांचं मनोरंजन करण्यासाठी गावातली माणसं कथाकथन करत. यात परिकथांपासून ते साहसकथांचं साभिनय सादरीकरण केलं जाई. त्याबद्दल त्यांना मिळणाऱ्या बिदागीवरच त्यांचा चरितार्थ चाले. किस्से कहाण्या ऐकवण्याचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांमुळे हळूहळू या भागाला नावच ‘किस्सा कहानी बाजार’ पडलं.

cropped-qissa-khwani.jpg

थोडक्यात कथा सादर करणं हे येथील बहुतांश लोकांच्या घराण्यात चालत आलेली कला आहे. याच किस्सा कहानी बाजार परिसरात बॉलिवूडचे ज्योष्ठ अभिनेते दिलीप कुमार जन्मले. इथल्याच एका गल्लीत कपूर कुटुंबातील पहिले अभिनेते पृथ्वीराज कपूर तसंच त्यांचे सुपुत्र राज कपूर जन्मले आणि इथल्याच एका हवेलीत जन्मले होते शाहरूखचे वडील ‘मीर ताज महंमद’…

 

srk_home22.jpg

पेशावरचे पठाण

पेशावर हा खरंतर पठाणांचा बालेकिल्ला. पठाण कबिले हे त्या काळी रानटी टोळ्यांप्रमाणे राहत. शस्त्रास्त्रं वापरणं, किडनॅपिंग, ब्लॅकमेलिंग, कर्ज देणं इत्यादी कामं त्यांचा मुख्य व्यवसाय बनून गेलं होतं. पण देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आणि परिस्थिती बदलून गेली. पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्याप्रमाणेच गांधींच्या आघाडीच्या अनुयायांपैकी एक होते ते पेशावरी पठाण ‘खान अब्दुल गफार खान’. ते इतके कट्टर गांधीवादी होते, की त्यांना सरहद्द गांधी संबोधलं जाई. त्यांनी प्रयत्नपूर्वक सर्व पठाणांना अहिंसक बनवलं. खुदाई खिदमतगर ही अहिंसावादी स्वातंत्र्यासेनानींची सेना उभी केली.

 

KAGK.jpeg

या अहिंसावादी पठाण संघटनेमध्येच मीर ताज महंमद आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सामिल होतं. घरातील बांबूंचा व्यवसाय करता करता स्वातंत्र्यासाठी लढण्यात हे खान कुटुंब पुढे होतं. मीर ताज महंमद हे या कुटुंबातलं शेंडेफळ. दिसायला सुंदर आणि अगदी तरूण. इंग्रजी, पश्तू, उर्दू आणि पंजाबी भाषांवर प्रभुत्व… यामुळे मीर ताज महंमद यांच्या सभांना कायम गर्दी होई. खान कुटुंबाला अर्थातच ब्रिटिश सरकारच्या रोषाचा सामना करावा लागे. घरी कमी आणि जेलमध्ये जास्त मुक्काम असे. या सगळ्यात लहानग्या आणि अभ्यासू मीर ताजच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये, म्हणून त्याला उच्च शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं.

mir-taj-mohammed-srk-father.jpg

 

आणि फाळणी झाली

दिल्लीमध्ये मीर ताज महंमद LLB चा अभ्यास करत होते आणि पेशावरमध्ये वेगळ्याच घडामोडी घडत होत्या. स्वातंत्र्याची पहाट उगवत होती. पण पेशावरसकट सगळा वायव्य सरहद्द प्रांत पाकिस्तानचा भाग होण्याची चिन्हं दिसू लागली. याविरोधात पुन्हा खान अब्दुल गफार खान आणि त्यांच्या अनुयायांनी आंदोलन सुरू केलं. मुस्लिम लीगला कडाडून विरोध केला. पण अखेर फाळणी झालीच आणि पेशावरमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पठाणांच्या माथी भारतीय हा शिक्का पुसला जाऊन पाकिस्तानी हा शिक्का बसला.

srk22.jpg

त्याहून भयंकर म्हणजे ज्या पठाणांनी पाकिस्तानला विरोध केला होता, त्यांच्या नावाचं फर्मान निघालं. खान कुटुंबाचंही त्यात नाव होतं. पाकिस्तानऐवजी भारताला पाठिंबा देणारे म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागलं. अशा परिस्थितीत दिल्लीहून घरी यायचा प्रयत्न करणाऱ्या मीर ताज महंमद यांना दिल्लीतच अडकून पडावं लागलं. पुन्हा पेशावरला गेल्यास जेलमध्येच आयुष्य काढावं लागेल याची कल्पना त्यांना आली आणि त्यांनी दिल्लीमध्येच आपल्या हिंदू मित्रांसोबत घरात राहाणं पसंत केलं…

peshawar_home.jpg

 

शाहरूख जेव्हा पाकिस्तानात गेला…

दिल्लीतच मीर ताज महंमद विवाहबद्ध झाले. शाहरूख आणि लाला रूख या दोन मुलांचा जन्म झाला. काळ लोटला तरी पाकिस्तानच्या ब्लॅक लिस्टमध्ये असणाऱ्या या स्वातंत्र्यसेनानीला आपल्या कुटुंबाची भेट घेणं शक्य होत नव्हतं. अखेर त्यांना एकदा परवानगी मिळाली. लहानग्या शाहरूखला घेऊन मीर ताज महंमद भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले. आपल्या घरी गेले. तिथे शाहरूखला पहिल्यांदाच आपले नातेवाईक पाहायला मिळाले. भावंडांशी खेळायला मिळालं. लाड झाले. पाकिस्तानच्या अनेक चांगल्या आठवणी घेऊन तो परतला. त्यामुळे पाकिस्तानद्वेषाचे संस्कार त्याच्यावर घडलेच नाहीत. दुसऱ्यांदा 1980 साली तो 14 वर्षांचा असताना पुन्हा सीमा पार करून किस्सा कहानी बाजारमधील आपल्या वडिलांच्या घरी आला. मात्र यावेळी अनुभव थोडा वेगळा होता. वडिलांशी त्यांचे नातेवाईक तितक्या प्रेमाने वागत नव्हते. एकतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. भारत-पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण झाले होते. नातेवाईकांमध्येही या दूरच्या भारतीय भावाबद्दल जिव्हाळा उरला नव्हता. त्यातून मीर ताज महंमद वारंवार येऊन इथल्या संपत्तीत आपला वाटा मागतील, अशी भीती त्यांच्या नातेवाईकांना वाटू लागली. त्यामुळे शाहरूखला आणि त्याच्या वडिलांना या भेटीत नात्यातील प्रेम अटल्याची जाणीव झाली. ‘पुन्हा येऊ नका’, हे ऐकावं लागलं. ही गोष्ट मीर ताज महंमद यांच्या जिव्हारी लागली. ते आजारी पडले आणि त्यातच पुढे कॅन्सरचं निदान झालं, ज्यात त्यांचा अंत झाला.

srk-hey-ram-e1265438816466.jpg

शाहरूख आणि पाकिस्तान

शाहरूख खानला पाकिस्तानात बालपणी ही भावना जरी वाट्याला आली असली, तरी पाकिस्तानातून त्याच्यावर कायमच प्रेमाचा वर्षाव होत राहिला. तो अजूनही होतोच आहे. परत येऊ नका सांगणाऱ्या नातेवाईकांऐवजी आता हाफिज सईदसारखा माणूसही त्याला पाकिस्तानचं निमंत्रण देतोय.

पण गंमत अशी आहे, की शाहरूखची मूळं ज्या पेशावरमध्ये होती, ते पेशावर पाकिस्तानचा भाग नव्हतं. त्याचे वडिल ज्या स्वातंत्र्यासाठी लढले ते पाकिस्तानचं नसून अखंड भारताचं होतं. वडिलांनी आपल्या लहानपणच्या गोष्टी सांगताना कायम पेशावरचे गोडवेच गायले होते. आपल्या मोहल्ल्याबद्दल, तेथील लोकांबद्दल छान छान आठवणीच सांगितल्या होत्या. त्या आठवणीतले लोक ना भारतद्वेष्टे होते ना हिंदूद्वेष्टे… आजही त्याच्या वडिलांच्या गावातल्या आई- आजीच्या वयाच्या महिला त्याला आशीर्वाद देत असतात, तेव्हा आई-वडील गमावलेला शाहरूख त्यांच्याशी ‘तुम्ही पाकिस्तानी, मी हिंदुस्तानी’ असा वाद घालत बसणं शक्यच नाही. फाळणीनंतरही पाकिस्तानातील आपल्या वडिलांच्या गावाचा, आपल्या मुळांचा धिक्कार करू शकत नाही… बेताल वक्तव्यं करण्यापेक्षा आपल्या कामातून दोन्ही देशांतील लोकांमध्ये आपलेपणाची भावना रूजवतोय. आणि जागतिक स्तरावर भारताचा सेक्युलर चेहरा बनून तो ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ म्हणत भारतच आपला ‘स्वदेस’ असल्याचं जाहीर करतोय.   

Continue Reading

Poll

विधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का?

Cricket Score Cards

Name POS Played Won Lost Points NRR

WI

1 3 3 0 6 2.9

ENG

2 3 2 0 5 2.269

SL

3 4 1 2 3 -1.171

SA

4 3 1 2 2 -0.914

BAN

5 3 0 3 0 -2.162

AUS

1 3 3 0 6 2.946

IND

2 3 3 0 6 1.634

NZ

3 3 1 2 2 -0.217

PAK

4 4 1 3 2 -0.987

IRE

5 3 0 3 0 -2.905
Name POS Played Won Lost Points NRR
Advertisement

Trending